निर्भया बलात्कार प्रकरणातील मुकेश सिंहला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा


नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज फेटाळून लावल्यामुळे मुकेश सिंह याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपतींकडे मंगळवारी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची ही विनंतीही फेटाळून लावली होती.

पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात या प्रकरणीतील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही असे म्हटले होते. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. हे लक्षात घेता फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरणार आहे. तुरुंग प्रशासनाला आज न्यायालयाला स्टेटस रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज दिल्ली सरकारने फेटाळून लावला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय पतियाळा हाऊस कोर्टाने दिला. त्यासाठी न्यायालयाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता.

फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत तुरुंग प्रशासनाने १७ जानेवारीपर्यंत माहिती द्यावी,असे आदेश दिल्ली न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले होते. तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असे न्यायालयाने म्हटले होते.

Leave a Comment