उदयनराजेंचा अपमान सहन करणार नाही – संभाजी भिडे


सांगली – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात सांगली बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने संभाजी भिडे यांनी समर्थकांशी संवाद साधताना उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नसल्याचे सांगत संजय राऊत यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली. त्याचबरोबर संजय राऊत यांनी वागताना बोलताना तारतम्य बाळगावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेविरोधात सांगली बंद नसून छत्रपती परंपरेचा अवमान करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. शिवसेनेच्या विचारांची देशाला नितांत गरज असल्याचे यावेळी संभाजी भिडे यांनी सांगितले. छत्रपतींच्या परंपरेचा अपमान करणे त्याचबरोबर उदयनराजेंविरोधातील वक्तव्याचा संताप व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारला असल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले. कोणत्याही पक्षाविरोधात हा बंद नाही. पूर्ण देशावर शिवसेनेचे राज्य असावे एवढा त्यांच्याबद्दल आदर आहे. पण जर शिवसेनेतील कोणी एवढे बेताल वक्तव्य करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे. समाजाचे स्वास्थ बिघडवू नये, अशी मागणी संभाजी भिडे यांनी यावेळी केली.

संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असे वागलेले आम्ही खपवून घेणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. तसेच बंद दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment