अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने पार केला १०० कोटींचा टप्पा


बॉक्स ऑफिसवर अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ चित्रपटाची घोडदौड सुरूच असून चित्रपटाला पहिल्या आठवड्यातच १०० कोटीचा आकडा गाठण्यात यश आले आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी १६ कोटी रुपयांचा गल्ला जमवत १०० कोटींचा टप्पा पार केला.

सर्वाधिक कमाई केलेल्या बॉलिवूडच्या २० चित्रपटांच्या यादीत स्थान ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ चित्रपटाने मिळवले आहे. अपेक्षित कमाई उत्तर भारतात झाली नसली तरी महाराष्ट्रात चित्रपट सर्वाधिक कमाई करीत आहे. समिक्षकांनी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला फार गौरवले नव्हते. असे असले तरी प्रेक्षकांनी चित्रपटाला उचलून धरले आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी आणि शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा सरकारनेही टॅक्स फ्रीचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी जोर धरु लागली असतानाच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लवकरच हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती दिली आहे.

Leave a Comment