असे आहे महाभारताचे आणि मकर संक्रांतीचे नाते

makar
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभ महापर्वही सुरु होत आहे. भारतामध्ये संक्रांतीचा सण बहुतेक सर्वच ठिकाणी साजरा केला जातो. तसे पाहिले तर सूर्य दर महिन्यामध्ये एका राशीतून निघून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करीत असतो. यालाच संक्रमण किंवा संक्रांती म्हटले जाते. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्या विशेष काळाला मकर संक्रांती म्हटले जाते. यंदाच्या वर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला असून, चौदा जानेवारीच्या मध्यरात्री सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होणार आहे. त्यामुळे पंधरा तारखेच्या पहाटेपासून मंगलकाळ सुरु होत असून, संक्रांतीचे दान आणि इतर पूजा अर्चा केल्या जाऊ शकणार आहेत. मकर संक्रांतीलाच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात येणार आहे. पण सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश हा चौदा तारखेच्या सूर्यास्तानंतर होणार असल्याने, शास्त्र नियमांच्या अनुसार मकर संक्रांती पंधरा तारखेला साजरी केली जाणार आहे.
makar1
हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या या सणाचे नाते महाभारताशी देखील आहे. पितामह भीष्मांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला असल्याचे म्हटले जाते. याच दिवशी गंगा भगीरथासोबत कपिल मुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्यांनतर सागराला मिळाली असल्याने मकर संक्रांतीच्या सणाला मोठे महत्व आहे. महाभारतावर आधारित आणखी एका आख्यायिकेच्या अनुसार शरशैय्येवर असलेल्या भीष्मांना खरेतर इच्छामरणाचा वर होता. पण त्यावेळी सूर्य दक्षिणायनात असल्याने भीष्मांनी इच्छामरण घेतले नाही. त्यानंतर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करून उत्तरायणात येताच, अर्जुनाच्या बाणाने उत्पन्न झालेले गंगाजल प्राशन करून भीष्मांनी देहत्याग केला, आणि त्यांना मोक्षप्राप्ती झाली. म्हणूनच या दिवशी गंगास्नानाचे उत्तर भारतामध्ये विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची आणि अग्नीची पूजा करण्याचाही प्रघात आहे.
makar2
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्व असून, या दिवशी तिळाचे दान शुभफलदायी मानले गेले आहे. तीळ शनीचे द्रव्य मानले गेले असून, तिळाच्या दानाने पापक्षालन होत असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी काळे किंवा पांढरे तीळ दान करण्याची पद्धत रूढ आहे. संक्रांतीच्या दिवशी केले गेलेले कोणतेही दान शुभ फल आणि समृद्धी देणारे मानले जाते. तीळ दान देण्याबरोबरच, कोणतेही धान्य, वस्त्र, लोकरीचे कपडे, पादत्राणे, सोने आणि धार्मिक पुस्तकांचे दानही या दिवशी केले जाते.

Leave a Comment