इराणचा अमेरिकी सैन्य असलेल्या इराकच्या लष्करी तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला


समार्रा – अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला ठार केल्यानंतर याचा बदला घेण्याचा निर्धार इराणने केला आहे. रविवारी इराणने पुन्हा इराकमधील एका लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. इराकचे चार जवान यामध्ये जखमी झाले आहेत. काही अमेरिकी जवान बगदादच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या हवाई तळावर प्रशिक्षण घेत होते. हा हल्ला याठिकाणीच झाल्याची माहिती आहे.

अल-बलाद या हवाई तळावर ‘कात्युशा’ प्रकारची आठ क्षेपणास्त्रे येऊन पडली. यामध्ये इराकचे दोन अधिकारी, आणि दोन एअरमन जखमी झाले आहेत. अल-बलाद हे इराकच्या एफ-१६ या विमानांच्या ताफ्याचे मुख्य हवाई तळ असून ही विमाने इराकने अमेरिकेकडूनच घेतली होती. अमेरिकेचे बरेच लष्करी अधिकारी या तळावर होते. पण, अमेरिका आणि इराणमधील तणाव पाहता, त्यांपैकी कितीतरी अधिकाऱ्यांना येथून हलवण्यात आले होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेथे केवळ १५ अमेरिकी सैनिक आणि केवळ एक लढाऊ विमान होते.

दरम्यान यापुर्वी ५ जानेवारीला (रविवारी) इराणने अल-जदरीया आणि बलाद हवाई तळाबाहेर अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले होते. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला झाला. इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. १९७९ नंतर अमेरिका आणि इराणने एकमेकांवर पहिल्यांदाच उघडपणे हल्ला केला आहे. याआधी दोन्ही देश एकमेकांवर लपून-छपून कारवाया करत होते.

Leave a Comment