उदयनराजेंकडून ‘तान्हाजी’च्या टीमचे कौतुक


अभिनेता-निर्माता अजय देवगण आणि ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. ‘तान्हाजी’ हा चित्रपट शुक्रवारी 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अजय देवगनच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘तान्हाजी’ च्या संपूर्ण टीमला उदयनराजेंनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून एक अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

अजय देवगनचा हा 100 वा चित्रपट आहे. त्याचबरोबर तब्बल 10 वर्षांनंतर अजय देवगन आणि काजोल एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे. सगळ्याच बाजूंनी हा चित्रपट खास असताना या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी उदयनराजेंच ट्विट कौतुकाची थाप ठरली आहे.


आपल्या ट्विटमध्ये उदयनराजेंनी म्हटले आहे की, तानाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा. तसेच त्यांनी हे ट्विट अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केले आहे.

‘छपाक’सोबत ‘तान्हाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. प्रेक्षकांनी दीपिकाच्या ‘छपाक’पेक्षा अजय देवगनच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला अधिक पसंती मिळत आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील हा आकडा स्पष्ट झाला आहे.

Leave a Comment