… तर १५ जानेवारीपासून ‘छपाक’वर येऊ शकते बंदी


मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पादुकोण अभिनीत छपाक चित्रपटात अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्ण भट्ट यांना श्रेय देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने निर्मात्यांना दिले आहेत. चित्रपटात पीडितेच्या वकीलांना श्रेय न दिल्यास १५ जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

शनिवारी यासंदर्भातील निकाल न्यायमूर्ती प्रतीभा एम.सिंग यांनी दिला. घटनेची माहिती अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा सिंग यांच्याकडून घेतली गेली. पण चित्रपटात त्यांना श्रेय का देण्यात आले नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना केला होता. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती प्रतीभा सिंग यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.

माहिती मागण्यासाठी चित्रपटाचे निर्माते लक्ष्मी यांच्या वकीलांकडे का गेले होते? तसेच या चित्रपटात त्यांना श्रेय देण्यास काय अडचण आहे, असा सवाल न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान केला होता. कोणताही करार दोन्ही पक्षांमध्ये झाला नव्हता. त्याचबरोबर त्यांना माहिती घेतल्यानंतर श्रेय देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी न्यायालयाला सांगितले होते.

लक्ष्मी अग्रवाल यांच्या बाजूने न्यायालयात आपण अनेक वर्षे खटला लढला आहे. चित्रपट तयार करताना स्क्रिप्ट तयार करण्यातही मदत केली होती. पण कोणत्याही प्रकारचे श्रेय आपल्याला न देण्यात आल्याचे भट्ट यांनी न्यायालयाला सांगितले होते. आपण मेघना गुलजार यांच्या १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत संपर्कात होतो. चित्रपट प्रदर्शित होताना त्यांना श्रेय दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. पण ७ जानेवारी रोजी चित्रपटाच्या प्रमिअरदरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचे श्रेय न देण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment