इतिहासाची आवड असणार्‍यांनी आवर्जुन पहावा असा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’


नवीन वर्षाच्या दुस-या आठवड्यात रिलीज झालेला अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चित्रपट ठरू शकेल. हा चित्रपट इतिहासाची आवड असणार्‍या दर्शकांनी अवश्य पहावा. मुघलांविरूद्ध तान्हाजी मालुसरे यांचे वडील लढले आणि मुलगा तान्हाजीवर श्वासाच्या शेवटच्या क्षणी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तान्हाजी हे चांगले मित्र आणि शूर योद्धा होते. एकीकडे, तान्हाजी यांच्या मुलाचे लग्न ठरले आहे, ते शिवाजी महाराजांना आमंत्रित करण्यासाठी जातात. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तान्हाजी मालुसरे यांच्यावर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी सोपवतात. मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडत आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे म्हणत ते कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलतात. कोंढाणा किल्ल्यावर तान्हाजी मालुसरे यांनी गाजवलेला पराक्रम या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.

अजय देवगन, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे यांनी या ऐतिहासिक चित्रपटात आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर, उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफ अली खान, सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि सुर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत देवदत्त नागे चित्रपटात झळकले आहेत. हे सगळेच त्यांच्या भूमिकेत शोभून दिसले आहेत.

हा चित्रपट त्यातील अॅक्शनसाठी नक्कीच बघायला हवा. चित्रपटातील सर्व अॅक्शन सीन्स अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजूही उत्तम आहे. 3 डी मध्ये हा चित्रपट बनविला गेला आहे. थ्रीडीच्या दृष्टिकोनातून तलवार बाजीचे काही सीन खूप रंजक बनले आहेत. भारतात चित्रपटातील संपूर्ण व्हीएफएक्सचे शूटिंग केले गेले आहे. ‘तान्हाजी’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटात कमालीचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment