आंध्रप्रदेश सरकार शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा करणार १५ हजार रुपये


हैदराबाद – दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जाहीर केली आहे. ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. वर्षाला १५ हजार रुपये या महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. मुलांचे शालेय शिक्षण, जोपर्यंत पूर्ण होत नाही ही मदत तोपर्यंत दिली जाणार आहे. गरीब महिलांना या योजनेमुळे आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

गेल्याच आठवड्यात यासंबंधी राज्य सरकारने आदेश जारी करत ४३ लाख मातांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत महिला ज्यांचे मुल सध्या शाळेत (पहिली ते बारावी) शिकत आहेत, मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित या योजनेसाठी ते पात्र असणार आहेत.

या योजनेचा शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढावी हा मुख्य उद्देश्य आहे. त्याचबरोबर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावा यासाठीही प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, अनाथ तसेच रस्त्यावर निवारा घेणारी मुले जे स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही आर्थिक मदत या संस्थांना दिली जाणार आहे. राज्य सरकारला २०१९-२० आर्थिक वर्षात योजनेसाठी ६४५५ कोटींचा खर्च येत असून त्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. लाभार्थी नेमके कोण आहेत याबाबत पारदर्शकता राहावी यासाठी ग्राम सचिवालयात यादी लावण्यात येणार आहे.

Leave a Comment