२७.६८ लाखांचा दंड भरल्यानंतर पोलिसांनी परत केली पोर्शे


गुजरात पोलिसांनी जप्त केलेली आपली कार मिळवण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल २७.६८ लाखांचा दंड भरला असून थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी पोर्शे ९११ ही कार योग्य कागदपत्रे नसल्यामुळे जप्त केली होती. अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात कारचे मालक रणजीत देसाई यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर कार त्यांच्या हवाली करण्यात आली. पोलिसांनी ही कार नोव्हेंबर महिन्यात जप्त केली होती.

आरटीओच्या आपल्या ट्विटर अकाऊंटवर अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी पावतीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी यामध्ये कारमालकाला २७.६८ लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. देशात पहिल्यांदाच एवढा मोठा दंड वसूल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.


वाहतूक पोलिसांनी ही कार योग्य कागदपत्रे नसल्यामुळे जप्त केली होती. आरटीओने यासाठी २७.६८ लाखांचा दंड ठोठावला. देशात आतापर्यंत ठोठावण्यात आलेली दंडाची ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी हेलमेट क्रॉसरोड येथे २८ नोव्हेंबर रोजी ही कार जप्त केली.

चालकाकडे चौकशी केली असता योग्य कागदपत्रे सादर करु न शकल्यामुळे कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिल्यामुळे आम्ही कार जप्त करत मोटार वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला होता. याचा अर्थ चालकाने आरटीओकडे दंडाची रक्कम जमा करावी आणि कार परत मिळवण्यासाठी पावती घेऊन हजर राहावे, असे पोलिसांनी सांगितले होते. सुरुवातीला चालकाला ९.८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण जेव्हा कारमालक दंडाची रक्कम भरण्यासाठी पोहोचले तेव्हा आरटीओने जुना रेकॉर्ड पाहिला आणि दंडाची रक्कम २७.६८ लाखांपर्यंत पोहोचली.

Leave a Comment