जिओच्या सेटिंग्समध्ये काही बदल करुन अ‍ॅक्टिव्ह करता येईल मोफत कॉलिंगची सेवा


नवी दिल्ली – आता आपल्या ग्राहकांना फ्री वाय-फाय कॉलिंगची सेवा टेलिकॉम क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या रिलायंस जिओकडून दिली जात आहे. कंपनीने देशभरातील ग्राहकांसाठी बुधवारी ‘व्हॉइस अँड व्हिडिओ कॉलिंग ओव्हर वाय-फाय’ ही सर्व्हिस सुरू करत असल्याची घोषणा केली. तुम्ही सध्याचा क्रमांक वापरुनच या नव्या सेवेनुसार कोणत्याही वाय-फाय नेटवर्कद्वारे मोफत व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग करु शकाल. यासाठी कोणतेही अतिरिक्त दर आकारले जाणार नाहीत.

तुमच्याकडे एखादा प्रीमियम स्मार्टफोन जर असेल तर, तुम्ही वाय-फायद्वारे काही सेटिंग्समध्ये बदल करुन मोफत कॉलिंग करु शकतात. ग्राहक व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग दरम्यान VoLTE आणि वाय-फायमध्ये सहजपणे स्विच करु शकतात असा दावा जिओने केला आहे. 150 पेक्षा अधिक हँडसेट मॉडेल्सला जिओची वाय-फाय कॉलिंग सेवा सपोर्ट करेल. ही सेवा संपूर्ण भारतात 7 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान उपलब्ध होईल. ही सेवा सेटिंग्समध्ये काही बदल करुन कार्यरत अ‍ॅक्टिव्ह करता येईल.

अँड्रॉइड फोनमधील सेटिंग्ससाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसच्या सेटिंग्स पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तेथील कॉल सेटिंग्स पर्यायावर क्लिक करुन डिव्हाइसमध्ये Wi-Fi कॉलिंग ऑप्शन सर्च करावे लागेल. तसे केल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनसमोर दिसणारे स्विच Enable किंवा On करावे लागेल. विशेष म्हणजे उत्तम अनुभवासाठी VoLTE आणि वाय-फाय कॉलिंग हे दोन्ही स्विच ऑन ठेवावे लागेल.

आयओएस फोनमधील सेटिंग्ससाठी तुम्हाला तुमच्या iOS डिव्हाइसच्या सेटिंग्स पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तेथे तुम्हाला Phone सेटिंग्सवर टॅप करावे लागेल आणि Wi-Fi Calling पर्यायासाठी सर्च करावे लागेल. तसेच त्यासमोर असलेले स्विच Enable किंवा On करावे लागेल.

या सेवेसाठी जिओकडून 150 पेक्षा अधिक स्मार्टफोनमध्ये सपोर्ट देण्यात आला आहे. वाय-फाय कॉलिंग सपोर्ट Apple iPhone 6s आणि यानंतर आलेल्या आयफोनशिवाय फ्लॅगशिप सॅमसंग डिव्हाइस, Samsung Galaxy Note 10, Galaxy S10 मध्येही देण्यात आला आहे. हा सपोर्ट Samsung Galaxy M20, Galaxy A70, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 यांसारख्या मिडरेंज स्मार्टफोनमध्येही मिळेल. पण, या यादीमध्ये वनप्लस किंवा ओप्पोच्या एकाही डिव्हाइसचा समावेश करण्यात आलेला नाही.

Leave a Comment