रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट; लवकरच निवृत्ती जाहीर करणार धोनी ? - Majha Paper

रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट; लवकरच निवृत्ती जाहीर करणार धोनी ?


नवी दिल्ली – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती जाहीर करु शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.

शास्त्री यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनेक वर्ष क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये धोनी खेळत असून २०१४ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटलाही रामराम करू शकतो. त्यानंतर तो टी-२० खेळणे या वयात पसंत करेल. पण त्याला त्यासाठी पुन्हा मैदानावर उतरावे लागणार आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण अद्यापही त्याने निवृत्तीबाबतची स्पष्टता दिलेली नाही. अशात त्याचा ऑस्ट्रेलियातील अनुभव संघासाठी उपयोगी ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याचा सहभागही टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी समजली जात आहे. त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली, तर त्याला टी-२० संघात नक्की जागा मिळेल, असेही शास्त्रींनी सांगितले.

दरम्यान, आजपर्यंत भारताकडून धोनीने ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ४८७६, १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. त्याने याशिवाय यष्टिरक्षणात, कसोटीत २५६ झेल व ३८ स्टम्पिंग, एकदिवसीयमध्ये ३२१ झेल व १२३ स्टम्पिंग आणि टी-२० त ५७ झेल व ३४ स्टम्पिंग केले आहेत.

Leave a Comment