राज्यातील सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून कामे करा


मुंबई – काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 16 मंत्र्यांना राज्यात मंत्री म्हणून कामकाज करत असताना ते कशा प्रकारे करायचे. तसेच राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी कोणकोणत्या प्रकारे कामकाज करायचे यासाठीचे एक प्रशिक्षणच दिले. त्याचबरोबर मंत्री म्हणून कामकाज करत असताना राज्यातील जनता प्रत्येकवेळी डोळ्यासमोर ठेवा, असे आदेश पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत दिले.

काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची एक बैठक शरद पवार यांनी बोलावली होती. पवार यांनी तब्बल तीन तास झालेल्या बैठकीमध्ये आपल्या राजकीय प्रवासाचा अनुभव सांगत प्रत्येक मंत्र्यांनी कामकाज करताना कोण कोणती काळजी घ्यावी आणि समाजाशी नाळ आपली कायम कशी ठेवावी यासाठीचे धडे दिले.

सरकारी अधिकारी आणि राज्यातील जनता यांच्यात प्रशासनात काम करत असताना एक समन्वय साधत आपली भूमिका कायम बजावली पाहिजे. प्रत्येक मंत्र्यांनी त्यासाठी आपली भूमिका बजावावी आणि आपल्या मतदारसंघात व मंत्रालयात आपला वेळ निश्चित ठेवावा, अशा सूचनाही पवार यांनी या बैठकीत दिल्या. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकार स्थापन झाल्यानंतर पवारांनी आपल्या मंत्र्यांची अशा प्रकारे ही पहिलीच बैठक बोलावली होती. आपण या बैठकीत राष्ट्रवादी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, मंत्री म्हणून कामकाज करताना कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लोकाभिमुख असेच कामकाज व्हावे यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी आपले योगदान दिले पाहिजे, अशा सूचनाही पवारांनी यावेळी दिल्या असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave a Comment