तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात विनयभंगाची तक्रार


मुंबई – अभिनेते नाना पाटेकर यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करुन #MeToo अभियानांतर्गत चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली असून त्यांच्यावर याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क येथील एकाच इमारतीमध्ये वकील नितीन सातपुते आणि तक्रारदार महिला राहतात. सातपुते यांनी घराजवळ गार्डन बनवले आहे. त्यावर तक्रारदार महिलेने आक्षेप घेतला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. आपल्याला याबाबत सातपुते यांनी धमकावले असल्याची तक्रार या महिलेने माहीम पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे केली होती. त्यावर ३० डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी होती. त्यावेळी महिला आयोगाच्या कार्यालयात आपल्याशी बोलताना सातपुते यांनी अश्लील शब्द वापरल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे होते. तिने केलेल्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२० रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment