काँग्रेसच्या पुस्तिकेत सावरकर आणि गोडसे यांच्यात समलिंगी असल्याचा उल्लेख


भोपाळ – सध्या भाजपने काँग्रेसवर काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेतील वादग्रस्त वक्तव्यावरून जोरदार हल्ला चढविला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस सेवा दलाच्या या पुस्तिकेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलिंगी संबंध असल्याचा उल्लेख या पुस्तिकेत करण्यात आला आहे. या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भोपाळमध्ये ११ दिवसांचे काँग्रेस सेवा दलाचे एक शिबिर सुरू होणार आहे. ही पुस्तिका या शिबिराच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आली आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून विनाकारण वाद घातला जात आहे. हे वाक्य एका पुस्तकातील संदर्भावरून या पुस्तिकेत घेण्यात आले असल्याचे सेवा दलाचे प्रमुख लालजी देसाई यांनी म्हटले आहे.

आणखी काही वादग्रस्त वाक्ये या पुस्तिकेत आहेत. एका ठिकाणी लिहिले आहे की, ब्रह्मचर्य व्रत घेण्याअगोदर नथुराम गोडसे यांचे एकाच व्यक्तीशी शारीरिक संबंध असल्याची माहिती मिळते. ती व्यक्ती म्हणजे सावरकर. या पुस्तिकेतील अन्य काही वक्तव्य वादग्रस्त आहेत. ज्यामध्ये अंदमानमधील कारागृहातून बाहेर पडल्यावर सावरकरांनी इंग्रजांकडून पैसे घेतल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मुस्लिम समुदायातील कोणाच्याही मृत्यूनंतर ते आनंद साजरा करीत असल्याचेही वक्तव्य या पुस्तिकेत करण्यात आले आहे.

लालजी देसाई यांनी या संदर्भात म्हटले आहे की, वरील सर्व विधाने डोमिनिक लेपियर आणि लॅरी कॉलिन्स यांचे पुस्तक ‘फ्रीडम ऍट मिडनाईट’ या पुस्तकातूनच घेण्यात आली आहेत. याच पुस्तकात समलिंगी संबंधांबद्दलचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment