केंद्र सरकारची चांद्रयान-३ साठी परवानगी


नवी दिल्ली – गगनयान आणि चांद्रयान-३ मोहीम इस्त्रो २०२० मध्ये लॉन्च करणार असून ही आनंदाची बातमी इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांना दिली आहे. त्यांनी इस्रोची पुढील मोहीम आणि योजनांची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली. केंद्र सरकारची चांद्रयान-३ मोहिमेला परवानगी मिळाल्याचे के सिवन यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर चार अंतराळवीरांची गगनयान मोहिमेसाठी निवड करण्यात आल्याचेही ते म्हणाले आहेत. आम्ही देशवासियांचे जीवनमान अवकाश विज्ञानाच्या सहाय्याने अजून चांगले करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

आम्ही २०२० मध्ये चांद्रयान-३ लॉन्च करणार असून जानेवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून गगनयानच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. चार अंतराळवीरांची निवड गगनयान मोहिमेसाठी करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. आम्ही २०१९ मध्ये गगनयान मोहिमेत चांगली प्रगती केल्याची माहिती के सिवन यांनी दिली आहे.

के सिवन यांनी चांद्रयान-३ बद्दल बोलताना माहिती दिली की, याचवर्षी चांद्रयान-३ मोहीम लॉन्च केली जाणार आहे. केंद्र सरकारची यासाठी परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-३ मोहीमेत आणि चांद्रयान-२ मध्ये बरच साम्य आहे. या मोहिमेवर काम देखील सुरु झाले आहे. याचे कॉन्फिगरेशन चांद्रयान-२ प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे.

फक्त देशातच नाही तर जगभरात चर्चा भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची झाली होती. भारताच्या या ऐतिहासिक जगाने मोहिमेची दखल घेतली होती. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. यासंबंधी बोलताना के सिवन यांनी सांगितले की, आम्ही यशस्वीपणे लँडिंग करु शकलो नसतो तरी ऑर्बिटर अद्यापही काम करत आहे. पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

Leave a Comment