तिहार तुरुंगात एकाचवेळी देता येणार चौघांना फाशी !


नवी दिल्ली: आता एकाचवेळी चार कैद्यांना तिहार तुरुंगात फाशी देता येऊ शकणार आहे. येथे फाशीसाठी आतापर्यंत कुठली विशेष व्यवस्था नव्हती, पण तेथे आता चार फाशीचे तख्त आहेत. हे काम सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. तुरुंग क्र. ३ मध्ये फाशीसाठीचे हे तीन नवे हँगरही तयार केले गेले आहेत. आधीपासूनच या तुरुंगात एक तख्त आहे. तिहार तुरुंग हा आता देशातील पहिला असा तुरुंग झाला आहे, जेथे एका वेळी फाशीचे चार तख्त असणार आहेत.

तिहार तुरुंगाच्या सूत्रांची अशी माहिती आहे की तुरुंगाच्या आत हे काम पूर्ण करण्यासाठी जेसीबी मशीन आणली होती. कारण जी विशिष्ट जागा फाशी देण्याची असते तेथे खाली एक बोगदा देखील बनवला जातो. मृत कैद्याला फाशी दिल्यानंतर या बोगद्यातून बाहेर काढले जाते. तिहारमधील या जुन्या तख्ताला देखील आता बदलण्यात आले आहे.

तुरुंगाच्या सूत्रांचे असे म्हणणे आहे की निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी फाशीचे तीन तख्त येथे तयार केले गेले आहेत. तुरुंग प्रशासन या चौघांच्या प्रकरणांचे स्टेटस रिपोर्ट न्यायालय उघडल्यावर देणार आहे. न्यायालयाचे कामकाज ६ जानेवारीला सुरु होणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

सध्या निर्भया प्रकरणातील चारही गुन्हेगार तिहार तुरुंगातील क्र. २ आणि ४ मध्ये आहेत. जेव्हा त्यांच्या फाशीसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन न्यायालयातून ब्लॅक वॉरंट जारी केला जाईल, तेव्हा चौघांना तुरुंगातील ३ क्रमांकाच्या सेलमध्ये हलवण्यात येईल. हा कक्ष फाशीच्या तख्ताजवळचा कक्ष आहे.

Leave a Comment