काँग्रेस भवनाची तोडफोड करणारे कार्यकर्ते माझे नाहीत: थोपटे


पुणे: काल पुण्यातील काँग्रेस भवनची करण्यात आलेली तोडफोडीची घटना दुर्देवी असून ही तोडफोड करणारे कार्यकर्ते माझे नसून माझा काहीही या घटनेशी संबंध नसल्याचे सांगत काँग्रेसचे नाराज आमदार संग्राम थोपटे यांनी हातवर केले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थोपटे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा व्यक्त केला आहे.

काँग्रेस आमदार संग्राम थोपटे मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. त्यात पुण्यातील काँग्रेस भवनची कालच काही लोकांनी तोडफोड केल्यानंतर थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण बाळासाहेब थोरात यांच्याशी आज चर्चा केल्यानंतर थोपटे यांनी ते कार्यकर्ते माझे नसल्याचा दावा केल्यामुळे काँग्रेस भवनवर हल्ला करणारे कोण होते? असा प्रश्न चर्चेला जात आहे. काँग्रेस भवनची तोडफोड करणारे आमचेच कार्यकर्ते होते की नाही? हे स्पष्ट नाही. या प्रकरणाशी माझ्या कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नाही. तरीही या प्रकरणाची आम्ही गंभीर चौकशी करणार असल्याचे थोपटे म्हणाले.

जो निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील, तो आम्ही अंतिम मानतो. पक्षश्रेष्ठीने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षाला योग्य वाटेल असाच निर्णय घेतला असल्याचे सांगतानाच पुण्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पुण्याला एखादे मंत्रिपद मिळायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जो प्रकार काल पुण्यात घडला, तो दुर्देवी होता. ही घटना पक्षाला शोभा देणारी नाही. गुंडगिरी आणि चुकीच्या प्रकाराला काँग्रेसमध्ये थारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करत या घटनेचा निषेध नोंदवला.

Leave a Comment