उद्यापासून पंढरपूर विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी


पंढरपूर : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून भाविकांच्या विरोधानंतरही विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. भाविकांचे जवळपास लाखभर मोबाईल ठेवता येतील अशा अडीच हजार लॉकरची व्यवस्था या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने तयार केली आहे. भाविकांना समितीला प्रत्येक मोबाईलला दोन रुपये याप्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहेत. हे मोबाईल दर्शनावरुन परत आल्यावर या ठिकाणाहून भाविकांना परत मिळणार आहेत.

हजारो पर्यटक आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल मंदिराची दर्शन रांग चंद्रभागेच्या पात्रापर्यंत पोचली आहे. मंदिर समितीच्या नवीन भक्तनिवासातया भाविकांच्या स्वागतासाठी फुले आणि फुग्यांच्या साहाय्याने आकर्षक सजावटीचे काम सुरू आहे. सर्व भक्त निवास इमारती पर्यटकांनी ओव्हरपॅक झाल्या आहेत.

1 जानेवारी 2020 पासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्यामुळे आता मंदिराजवळील दर्शन मंडपात मोबाईल लॉकरच्या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाविकाला या ठिकाणी विठुरायाच्या दर्शन रांगेत उभारण्यापूर्वी आपले मोबाईल या लॉकरमध्ये आणून पावती घ्यावी लागणार आहे. आपले ओळखपत्र मोबाईल ठेवण्यासाठी आवश्यक असणार असून भाविकाला त्याशिवाय मोबाईल ठेवता येणार नाहीत.

भाविकाला मोबाईल ठेवल्यानंतर पावती दिली जाणार असून यासाठी प्रति मोबाईल दोन रुपये सेवा शुल्क द्यावा लागणार आहे. दर्शनाला कितीही वेळ लागला तरी पुन्हा मोबाईल घेताना त्याला वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. यात्रा काळात देवाच्या दर्शनाला 18 ते 20 तासांपर्यंत वेळ लागत असल्याने ही सुविधा समितीने दिली आहे. नवीन वर्षाचे पहिले काही दिवस संपल्यावर पुन्हा गर्दीचा ओघ कमी होणार असल्याने समितीला या व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करता येणार आहेत.

सुरक्षेच्या कारणावरून मंदिर समितीने पूर्वी मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला होता. मोबाईल लॉकरच्या नावाने त्यावेळी पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी या प्रकाराविरोधात आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठविण्यात आली होती. आता ही बंदी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment