नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर व त्याच्या परिवाराला कुटुंबीयांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याने या प्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.
भाजप खासदाराला ‘गंभीर’ धमकी
क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर भाजप खासदार गौतम गंभीर नेहमीच रोखठोक मते मांडत असतो. तो त्यामुळे कायम चर्चेत असतो. पण यावेळी फोनवरून त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने तो चर्चेत आला आहे. आपल्याला काही अनोळखी व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे त्याने सांगितले.
त्याने यासंबंधी दिल्ली पोलिसांना पत्राद्वारे माहिती देऊन तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. त्याने यासंदर्भात दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्यात येईल अशा धमकीचा फोन आला होता. एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात यावा, अशी विनंती मी करत आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे गंभीरने पोलीस उपायुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.