शिवेंद्रराजेंसह 80 जणांवर टोलनाका आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल


सातारा – बुधवारी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले होते. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात आमदार भोसले यांच्यासह 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावर सुविधा द्याव्यात, रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत, अर्धवट पुलांची कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी शहरवासियांची मागणी आहे. नेटकऱ्यांनी या मागणीसाठी जोरदार आवाज उठवला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे संतापाची लाट असून बैठका घेण्यापलीकडे जिल्हा प्रशासनाने काही न केल्यामुळे आमदार शिवेंद्रराजे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत टोलनाक्यावर सनदशीरमार्गाने हल्लाबोल केला होता.

टोल नाक्यावर रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशी घोषणाबाजी करत मोर्चा गेला होता. तसेच शिवेंद्रसिंह राजेंनी सुविधा द्या अन्यथा टोल वसुली बंद करा, म्हणत टोलच्या मार्गीकेवर उभे राहून वाहनचालकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत 80 जणांवर गुन्हा दाखल केला.

Leave a Comment