आनंद महिंद्रा आता बिगर कार्यकारी अध्यक्ष


नवी दिल्ली : अग्रमानंकित उद्योग समूह असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रामध्ये वरिष्ठ पातळीवर खांदेपालट करण्यात आले असून पुढील आर्थिक वर्षापासून मार्गदर्शकच्या भूमिकेत महिंद्रा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आनंद महिंद्रा दिसणार आहेत. आनंद महिंद्रा १ एप्रिल २०२० पासून समूहाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष होणार आहेत. पवन कुमार गोयंका यांची महिंद्रा समूहाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी गोयंका यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शुक्रवारी वरिष्ठ व्यवस्थापनातील फेरबदलांची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने शेअर बाजाराला दिली. त्यात आनंद महिंद्रा १ एप्रिल २०२० पासून बिगर कार्यकारी अध्यक्ष होणार आहेत. व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पवन कुमार गोयंका यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत कार्यकाळ गोयंका यांचा असला तरी पुनर्नियुक्ती नंतर गोयंका १ एप्रिल २०२१ पर्यंत या पदावर कायम राहतील. वरिष्ठ अधिकारी पुढील दोन आठवड्यांत निवृत्त होणार असून वरिष्ठ व्यवस्थापनात फेरबदल होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

आनंद महिंद्रा पुढील आर्थिक वर्षापासून बिगर कार्यकारी अध्यक्ष या नात्याने कंपनीच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पडणार आहेत. १ एप्रिलपासून मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून समूहाचे स्ट्रॅटेजी चेअरमन अनीष शाह यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिंद्रा ऑटोमोटीव्हचे कार्यकारी संचालक म्हणून ४ वर्षांसाठी महिंद्रा ट्रॅक्टरचे विद्यमान अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment