पायल रोहतगीला 8 दिवसांची न्यायालयीन कोठडी


अहमदाबाद – बूंदीच्या स्थानिक न्यायालयाने अभिनेत्री पायल रोहतगीला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधून रविवारी (15 डिसेंबर) राजस्थान पोलिसांनी पायलला ताब्यात घेतले होते. 21 सप्टेंबरला पायलने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात तिने वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजस्थानमध्ये बूंदीमधील काँग्रेस कार्यकर्त्यानी 10 ऑक्टोबरला पायलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पोलिसांनी आयटी अॅक्ट आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पायल रोहतगीने गुन्हा दाखल झाल्यानंतर बुंदी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने तिला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


आपल्या अटकेची माहिती पायलने स्वतः आपल्या ट्विटर हँडलरवरुन दिली. ट्विटमध्ये ती म्हणाली होती, मोतीलाल नेहरुंवर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. मी गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे थट्टा झाली आहे, तिने हे ट्विट गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलेले आहे.


आपल्याला अटक झाल्याची माहिती पायलने स्वतः सांगितल्यानंतर अभिनेत्री कोयना मित्रा आणि दिग्दर्शिका रीमा कागती तिच्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. रिमा कागतीने पायलला पाठिंबा देत ट्विटरवर लिहिले होते की, जे काही आतापर्यंत पायल रोहतगी बोलायची ते मला कधीच पटायचे नाही. मला ती मुर्ख वाटायची. पण लोकशाहीत एखाद्याला अशाप्रकारे अटक करणे योग्य नाही. त्याचबरोबर पायलच्या अटकेवर अभिनेत्री कोयना मित्रानेही प्रश्न उपस्थित केले. कोयनाने लिहिले की, एका तासासाठी तू तुझे नाव हाफिज सईद ठेव. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.

Leave a Comment