पंकजांनी नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाला


नाशिक : भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी आज नाशिकमध्ये एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भगवानगडावरील महाप्रसादाचे ताट पंकजा मुंडे यांनी नाकारल्याचे म्हटले आहे. नामदेवशास्त्री यावेळी म्हणाले की, पंकजा मुंडेंनी जे ताट नाकारले, ते ताट त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंनी स्वीकारले.

यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भगवानगडावरील महाप्रसादाचे ताट यापूर्वी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे स्वीकारत होते. त्यानंतर ते ताट पंकजा मुंडे स्वीकारत होत्या. पण तेच ताट आता त्यांनी नाकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी ते ताट स्वीकारले. कारण भगवान बाबांची भक्ती त्यांच्या रक्तातच आहे. धनंजय मुंडेंना पंकजांनी नाकारलेला महाप्रसाद मिळाल्याचे नामदेवशास्त्री यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंनी गेल्या काही वर्षात अनेक अपमान पचवले आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या तिघांचे धनंजय मुंडे यांच्यात गुण असल्यामुळेच राजकारणात त्यांना यश मिळत आहे. दरम्यान, भगवान गडावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नसल्याचे नामदेव शास्त्रींनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरुन जो वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा जरी पडला असला तरी सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. एकीकडे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेवर स्तुतीसुमने उधळली, तर दुसरीकडे पंकजा मुंडेंवर मात्र महाप्रसादाचे ताट नाकारल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment