नेहरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अटक


कायमच वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी एका वादग्रस्त व्हिडीओमुळे बातम्यांच्या मथळ्यात आली आहे. पायलने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ तयार केला होता. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणात तिला अटक केली आहे. याची माहिती स्वतः पायलने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक वादग्रस्त व्हिडीओ अभिनेत्री पायल रोहतगीने तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून राजस्थान पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पायल रोहतगीने पोलिसांनी अटक केल्यानंतर स्वतःच्या ट्विटरवरून अटक झाल्याची माहिती दिली. मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडीओ बनवल्याच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मी बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करी झाली असल्याचे पायलने म्हटले आहे. तिने हे ट्विट गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. पायल रोहतगीने गुन्हा दाखल झाल्यानंतर बुंदी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण, ती सुनावणी झाली नाही. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे.

Leave a Comment