या यादीतील आपले स्थान फेसबुक, गुगल, अल्फाबेटने गमावले


ब्लूमबर्ग – अमेरिकेत नोकरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी असलेल्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीतुन नोकरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, गुगल, अल्फाबेट या तिन्ही कंपन्यांनी आपले सर्वोच्च स्थान गमावले आहे. या तिन्हीपैकी एकाही कंपनीचा यादीमध्ये आता समावेश नाही. या तिन्ही कंपन्यासाठी हे निश्चितपणे धक्कादायक आहे. अशा स्वरुपाची यादी दरवर्षी ग्लासडोअरकडून प्रसिद्ध केली जाते.

हबस्पॉटने ग्लासडोअरने यंदा प्रसिद्ध केलेल्या नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही सुद्धा एक सॉफ्टवेअर कंपनी असून ही कंपनी क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात काम करते. यादीमध्ये अन्य सॉफ्टवेअर कंपनी डॉक्युसाईनने दुसरा क्रमांक मिळवला आहे. यादीत अल्टिमेट सॉफ्टवेअर ही कंपनी आठव्या स्थानावर आहे.

गेल्या दहा वर्षांत तीन वेळा नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण असा किताब मिळवणारी फेसबुक कंपनी यंदा यादीमध्ये २३ व्या स्थानावर आहे. पहिल्यांदाच या यादीमध्ये फेसबुक २३ व्या स्थानावर गेली आहे. २०११ पासून पहिल्यांदाच ही स्थिती ओढावली आहे. गेल्या आठ वर्षांपासून यादीमध्ये गुगल पहिल्या दहा कंपन्यांमध्ये आहे. तर गुगल २०१५ मध्ये यादीत सर्वोत्कृष्ट कंपनी ठरली होती. पण गुगल यावेळी यादीमध्ये ११ व्या स्थानावर गेली आहे.

यावेळी यादीमध्ये अॅपल ८४ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे. अॅपल आतापर्यंत कायम पहिल्या २५ कंपन्यांमध्ये स्थान मिळवित होती. दुसरीकडे अमॅझॉन कंपनी सलग १२ व्या वर्षी या यादीत स्थानच मिळवू शकलेली नाही. या कंपनीमध्ये अंतर्गत वातावरण सकारात्मक नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment