हे सरकार बलात्काऱ्याला २१ दिवसात देणार मृत्यूदंड


हैदराबाद : आंध्र प्रदेशात महिलांच्या सुरक्षततेबाबत हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर ठोस पावले उचलली जात आहेत. आंध्र प्रदेश सरकारने बलात्कारानंतर पीडितेला ताबडतोब न्याय देण्यासाठी नव्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. ‘एपी दिशा अधिनियम’ असे नाव या विधेयकाला देण्यात आले आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना या विधेयकात मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर दोषी आढळल्यास २१ दिवसांत शिक्षा होईल, अशीही तरतूद आहे.

आंध्रप्रदेश सरकारने हैदराबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत तातडीने एक नवा कायदा आणण्याचा निर्णय़ घेतला आहे. कलम ३५४ मध्ये संशोधन करत यामध्ये नवीन ३५४ ई कायदा तयार करण्यात येणार आहे. लवकरात लवकर शिक्षा महिला आणि मुलींसोबत अत्याचार आणि शारीरिक शोषण करणाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करत लगेचच निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये २१ दिवसात शिक्षा दिली जाणार आहे.

आंध्र प्रदेश सरकारच्या कॅबिनेटने बैठक घेत हा निर्णय घेतला. या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. हे विधेयक मंजूर झाले तर ७ दिवसाच्या आत पोलिसांनी चौकशी पूर्ण करुन १४ दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर आरोपीला २१ दिवसाच्या आत शिक्षा दिला जाणार आहे. देशात आतापर्यंत अनेक असे गुन्हे घडले आहे. पण अनेक गुन्ह्यांमधील गुन्हेगार अद्यापही मोकाट फिरत आहेत. गुन्हेगारांना अनेक प्रकरणांमध्ये अटक होऊनही त्यांना लवकर शिक्षा होत नसल्यामुळे आंध्रप्रदेश सरकारचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

Leave a Comment