आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून रशियाचा पत्ता कट


नवी दिल्ली – रशियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) घेतल्यामुळे आता पुढील चार वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून रशिया हा देश बाद झाला आहे. विशेष म्हणजे टोकियोमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक २०२०मध्ये आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये रशियातील खेळाडूंना खेळता येणार नाही.

रशियावर ही बंदी डोपिंगबाबत चुकीचा तपशील पुरवल्याने घालण्यात आली आहे. याबाबतची तपशीलवार माहिती वाडाच्या प्रवक्त्याने दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये वाडाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. ४ वर्षांच्या बंदीचा कठोर निर्णय एका लॅबमधून डोपिंगबाबत योग्य अहवाल न दिल्याने एकमताने घेण्यात आल्याचे ‘वाडा’ने सांगितले.

रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोपदेखील झाले. अखेर ‘वाडा’ने रशियावर चार वर्षांची ऑलिम्पिक बंदी घातली. आता रशियाचा संघ पुढील ४ वर्ष ऑलिम्पिकमध्ये किंवा कुठेही पाहायला मिळणार नाही.

दरम्यान, ही बंदी रशियावर घातली असली तरी ज्या खेळाडूंना डोपिंग चाचणीत क्लिन चीट मिळेल ते खेळाडू तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे क्लिन चीट ज्या खेळाडूंना मिळेल त्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील २१ दिवसात वाडाच्या या निर्णयाला रशिया आव्हान देऊ शकतो. असे सांगण्यात आले. जर रशियाने आव्हान दिल्यास या प्रकरणी स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होऊ शकते. दरम्यान, वाडाचा रशियावरिल कारवाईचा निर्णय क्रीडाविश्वातील सर्वात कठोर निर्णय मानला जात आहे.

Leave a Comment