इतिहास जमा होणार मुंबईची शान असलेल्या डबल डेकर बस?


मुंबई : मुंबईतील शान असलेली बेस्टची डबर डेकर बस आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील 120 बसेस पैकी 72 बसेस 2020 स्क्रॅप होणार आहेत. त्याचबरोबर निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचे आयुर्मान संपले आहे. पण असे असले तरी पूर्णत: मुंबईतील डबलडेकर बस बंद होणार नसल्याचे बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी आश्वासन दिले आहे.

बेस्ट प्रशासनाने 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेसचे आयुर्मान संपत आल्याने त्या स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर उर्वरित डबल डेकर बसही कमी केल्या जातील अशी शक्यता असल्यामुळे मुंबईकरांच्या सेवेत असणारी डबल डेकर बस हळूहळू नामशेष होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईची डबल डेकर बसही ओळख असून सगळ्यांच्याच डबल डेकर बसमधून प्रवास करणे आवडीचा भाग राहिला आहे. या डबल डेकर बस स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. पण त्यांच्या देखभाल करण्याचा खर्च परवडत नसल्याने या डबल डेकर बस आता बेस्टमार्फत हळूहळू कमी केल्या जात आहेत.

पण बसेसची संख्या कमी करण्यात येत असली तरी त्या पूर्णत: बंद होणार नसल्याचे बेस्ट अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. काही डबल डेकर बस नवीन मेट्रो मार्ग, उड्डाण पुलामुळे कमी केल्या जात आहेत. पण त्या पूर्णतः बंद केल्या जाणार नसल्याचे अनिल पाटणकर यांनी सांगितले.

Leave a Comment