…तर मला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल; एकनाथ खडसे


जळगाव – भाजपच्या निर्णय प्रक्रियेसह कोअर ग्रुपमधून मला काढून टाकण्यात आले असून माझ्यावर काही व्यक्तींकडून सातत्याने अन्याय आणि अत्याचार करत अपमानीत केले जात आहे. जर हाच प्रकार यापुढेही सुरू राहिला, तर मला टोकाचा निर्णय घेत पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाराजी दूर न झाल्यानेच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. खडसे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. नेहमीप्रमाणे आपल्या भावनांना यावेळी खडसेंनी वाट मोकळी करून देत भाजप पक्ष नेतृत्त्वाला लक्ष्य केले. पण प्रथमच निर्णायक भूमिका खडसेंनी मांडल्याने राजकीय वर्तुळ खळबळ निर्माण झाली आहे.

खडसे पुढे म्हणाले, मी गेल्या 25 वर्षांत वेळोवेळी मी पक्ष सोडणार नाही, हे सांगितले आहे. माझ्या मनात देखील पक्ष सोडण्याचा विचार नाही. 40 ते 42 वर्षे पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी जी व्यक्ती झटली आहे. पक्ष संघटन प्रतिकूल परिस्थितीत देखील उभे केले, चुकीचा विचार त्याच्या मनात पक्षाविषयी येऊच शकत नाही. पण माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न पक्षातील काही लोकांकडून सातत्याने सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक असताना मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आले. मला जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमांना देखील बोलावले जात नाही. मला अशा रितीने अपमानित करण्याचे काम सुरू असल्यामुळे माझ्या राज्यभरातील समर्थकांना मी पुढे काय भूमिका घ्यायची? याबाबत विचारणा करणार आहे. घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे? मी समर्थकांच्या सांगण्यानुसार याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे अप्रत्यक्षपणे संकेतच दिल्याची चर्चा राजयकीय वर्तुळात रंगली आहे.

मला पक्षातील काही व्यक्तींकडून सतत अपमानित केले जात आहे. कुठपर्यंत हे सहन करायचे. माझी नोंदच घेतली जात नसेल, तर मला कुठेतरी विचार करावा लागेल. शेवटी मी पण माणूसच आहे. मी काही देव नाही. मलाही भावना आहेत. जो काही निर्णय मी घेईल तो पक्षाशी बोलूनच घेईल. वारंवार अपमानित केले जात असेल, तर मला वेगळा विचार करावाच लागेल, असे सांगत खडसेंनी भाजप पक्ष नेतृत्त्वाला निर्वाणीचा इशारा दिला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर एका खोलीत तब्बल 2 तास बंद दाराआड चर्चा झाली. खडसेंनी यावेळी चंद्रकांत पाटलांना पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांचे सर्व पुरावे दिले. त्यात संबंधितांचे फोन, कॉल रेकॉर्डिंग, मेसेजे, काही सीडीज यांचा समावेश असल्याची माहिती खुद्द खडसेंनी चर्चेनंतर पत्रकारांना दिली. पक्षश्रेष्ठी या साऱ्या बाबींची दखल घेतील. हा पक्षांतर्गत शिस्तीचा भाग असल्याने तुम्ही या प्रकाराबाबत माध्यमांजवळ वाच्यता करू नका, असेही चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचे खडसे म्हणाले.

Leave a Comment