वजन का वाढते ?


वजन वाढणे हा आपल्या शरीराचा गुण आहे. या शरीरात जेवढे जास्त अन्न टाकले जाईल आणि त्यातले जेवढे कमी अन्न पचवले जाईल तेवढे आपले वजन वाढत जाईल हा अगदी सरळ सरळ हिशेब आहे. त्यामुळे या विषयातले तज्ञ वजन कमी करण्यासाठी कमी खाण्याचा आणि हलके अन्न खाण्याचा सल्ला देतात. म्हणजेच वजनावर खाण्याचा परिणाम होतो असे मानले जाते.यात काही चूक नाही पण काही वेळा खाण्याची अनेक पथ्ये पाळूनही जाडी व वजन वाढत जाते. म्हणजे वजन वाढण्याची इतरही काही कारणे आहेत. ती कारणे आता शोधली गेली आहेत. तज्ञांना असे आढळले आहे की, झोप कमी असणे हेही वजन वाढण्याचे एक कारण होऊ शकते.

रात्री उशीरापर्यंत जागणे आणि तणावाखाली काम करीत राहण्याने शरीरातल्या काही यंत्रणांवर दबाव येतो. हा दबाव आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो. रात्रीच्या जागरणाचा हा परिणाम कमी करण्यासाठी कितीही व्यायाम केला तरीही काही उपयोग होत नाही. कारण जागरण करणे हा निसर्गाशी विसंगत असा व्यवहार असतोे. निसर्गाने आपल्याला रात्र झाली की झोपायला सांगितले आहे. पण आपण रात्री झोपण्याऐवजी काम करीत बसतो त्यामुळे शरीरातल्या चयापचय क्रिया बाधित होतात आणि त्याचा परिणाम शरीराच्या वजनावर होतो. तेव्हा वजन कमी करण्याच्या उपायात रात्री लवकर झोपणे, रात्री काम न करणे आणि पुरेशी झोप घेणे याही गोष्टींचा समावेश केला गेला पाहिजे.

आरोग्याचे सल्ले देणारे लोक आपल्याला अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण किती पाणी प्यावे हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. सल्ला ऐकून काही लोक फारच पाणी प्यायला लागतात. या जादा पाण्यानेही वजन वाढत असते. तणावाखाली जगणे हेही वजन वाढण्याचे कारण आहे असे दिसून आले आहे. पण तणावाचा आपल्या वजनावर कसा परिणाम होतो हेही समजून घेतले पाहिजे. तणाव वाढायला लागला की, तणावावर मात करणारी औषधे घेतली जातात. या औषधामध्ये शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते म्हणजे पिलेले पाणी शरीरात मिसळून जात नाही आणि या साठलेल्या पाण्याचा परिणाम वजनावर होतो. एकंदरीत असे म्हणता येईल की वजन वाढणे हे केवळ आहारावरच अवलंबून नसून विहारावरही अवलंबून आहे. आपले वर्तनही चांगले आणि नियमानुसार हवे तरच वजन नियंत्रणात राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment