हैदराबाद एनकाउंटरच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशाचे सूचक वक्तव्य


जोधपूर: शुक्रवारी जोधपूर येथील कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायाने कधीही सूडभावनेचे रुप घेता कामा नये, असे प्रतिपादन केले. हैदराबाद एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केले. सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले की, तात्काळ न्याय हा व्हायला पाहिजे किंवा झालाच पाहिजे, असे मला वाटत नाही. तसेच कधीही सूडाचे रुप न्यायाने घेता कामा नये. न्यायाचा सूड झाला तर त्याचे चारित्र्य संपते, असे मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले.

हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरूणांनी बलात्कार केला होता. आरोपींनी त्यानंतर त्या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला होता. देशभरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते.

पण चारही आरोपी गुरुवारी पहाटे हे चकमकीत ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या आरोपींना पुराव्यांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी नेले होते. या आरोपींनी त्यावेळी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बंदुकीतून त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले होते.

पीडितेवर अमानुषपणे या आरोपींनी अत्याचार केल्यामुळे देशभरात त्यांच्याविषयी संतापाची भावना होती. त्यामुळे अनेकांनी सायबराबाद पोलिसांच्या या कृतीचे स्वागत आहे. तर अनेकांनी हा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याचे सांगत पोलीस एनकाउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मानवधिकार आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment