‘त्या’ नराधामांचा कर्दनकाळ ठरला हा पोलीस अधिकारी


हैदराबाद – हैदराबादमध्ये पोलिसांनी आज सकाळी पशुवैद्यक डॉक्टर महिलेच्या बलात्काराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींचा एन्काऊंटर केला. ही घटना हैदराबादमधील राष्ट्रीय महामार्ग 44 जवळ घडली असून या घटनेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया पुढे येत आहेत. सकाळी वाऱ्यासारख्या पसरलेल्या या बातमीने सर्व स्तरांतून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. यानंतर पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांच्या नावाचा सर्वत्र गौरव होत आहे.

त्यांनी 14 मार्च 2018 ला आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हैदराबादचा गेल्या वर्षी देशातील सर्वात शांत शहरांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. शहरात घटलेला क्राईम रेट याचेच द्योतक होते. पण, महिला डॉक्टरवर 27 तारखेला झालेल्या हत्येची बातमी पसरल्यानंतर वैद्यकीय तपासात शारिरीक आत्याचार झाल्याचे समोर आले आणि एकेकाळी देशभरातून शांत शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहराती प्रतिमा मलिन झाली. पोलिसांनी तीन दिवसात तत्परता दाखवत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना फाशी देण्याची मागणी सर्व समाजमाध्यमांतून होत असतानाच आरोपींचा सायबराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

आयुक्त सज्जनार यांनी या खटल्याचा तपास सुरू असताना घटनाक्रम कसा घडला हे दाखवण्यासाठी घटनास्थळी आरोपींना नेण्याची संमती मागितली. पोलिसांनी घटनाक्रम स्पष्ट होण्यासाठी घटनास्थळी गेल्यानंतर त्यांचा एन्काऊंटर केला. पळून जाण्याच्या प्रयत्न आरोपी करत असल्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्ही सी सज्जनार हेच या सर्व घटनाक्रमाचा केंद्रबिंदू होते. सज्जनार यांनी याधीही एन्काऊंटर केल्याने त्यांचे नाव कायम चर्चेत होते. 2008 साली (तेव्हाचा आंध्र प्रदेश) तेलंगणामधील वारंगल येथे एन्काऊंटर स्पेशलिस्ट व्ही सी सज्जनार यांनी कॉलेजच्या मुलीवर अॅसिड फेकलेल्या घटनेतील तीन आरोपींना कंठस्नान घातले होते. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात विवाद झाले. कस्टडीत असताना या आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवल्याने त्यांना गोळ्या घातल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले होते.

Leave a Comment