लोकसभा अध्यक्षांनी रावसाहेब दानवेंना झापले !


नवी दिल्ली – काल संसदेतील कामात लक्ष नसल्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हा प्रकार प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान घडला.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधी बाकांवर काही दिवसांपूर्वी एनडीए सरकारमधून बाहेर पडलेले शिवेसनेचे खासदार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना शिवसेनेचे सदस्यही कोंडीत पकडण्याची संधी सोडत नाही. त्यातच शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दानवेंना त्यांच्या खात्यासंबंधी प्रश्न विचारले. पटलावर त्यांचे एकून तीन प्रश्न होते.

गोडसेंनी दानवेंना प्रश्न विचारताना इंग्रजी भाषेतून विचारल्यामुळे दानवेंचा गोंधळ उडाल्यामुळे अध्यक्षांकडे त्यांनी सदस्याने प्रश्न पुन्हा विचारावा, अशी विनंती केली. त्यावर अध्यक्षांनी संताप व्यक्त करत दानवेंना चांगलेच झापले. सदस्य प्रश्न विचारत असताना कामावर लक्ष देत जा, असे म्हणून त्यांची विनंती फेटाळून लावत गोडसेंना प्रश्न पुन्हा न विचारण्याची सूचना केली व तो प्रश्न नंतर विचारा असे आदेश दिल्यामुळे खासदार गोडसेंना दुसरा प्रश्न विचारावा लागला. दानवे लोकसभा अध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे चांगलेच गडबडले. त्यामुळे गोडसेंनी विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना द्यावे लागले.

एकंदरीत सभागृहात रावसाहेब दानवेंना सजग न राहण्यामुळे अध्यक्षांनी चांगलाच झटका दिला. अध्यक्षांनी अशा सक्त शब्दात खडसावल्यामुळे दानवेंना चांगलाच धडा मिळाला. आजचे लोकसभा अध्यक्षांचे रूप पाहता यानंतर दोन्ही बाजूचे सदस्य आणि मंत्रीसुद्धा चोख काम करतील व लोकांच्या पैशांवर चालणाऱ्या या सर्वोच्च सभागृहात गांभीर्याने चर्चा होतील, अशी आशा आहे.

Leave a Comment