ताज्या फळांचे व भाज्यांचे रस आरोग्यास हितकारी


आपल्या आहारामध्ये ताजी फळे व भाज्यांचा समावेश असणे अतिशय गरजेचे असते, हे सर्वांनाच माहित आहे. फळे व भाज्यांमध्ये असलेली जीवनसत्वे, क्षार व फायबर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारी असतात. त्यामुळे त्या फळांचे किंवा भाज्यांचे सेवन करताना त्यांच्यामधील ही सर्व पोषक द्रव्ये आपल्या शरीरामध्ये कशी शोषली जातील विचार करणे गरजेचे आहे. कित्येकदा घरातील लहान मुले , किंवा अगदी वडीलधारी मंडळी सुद्धा काही भाज्या किंवा फळे बघून नाक मुरडताना दिसतात. अश्यावेळी, भाज्या खाल्ल्या जात नसतील तर त्या शिजवून खाण्यापेक्षा त्यांचा रस काढून तो रस इतर आवडत्या फळांच्या रसाबरोबर मिसळून प्यावयास देणे हा एक चांगला पर्याय आहे.

ताज्या फळांचे किंवा भाज्यांचे रस प्यावयास दिल्याने त्यांच्यामधील पोषक द्रव्ये शरीरामध्ये इतर अन्नाच्या मानाने लवकर शोषली जातात. फळांचे किंवा भाज्यांचे रस काढल्याने त्यामधील पचण्यास अवघड असलेले फायबर काढून टाकले जाते. त्यामुळे रस लवकर पचतो. अशक्तपणा आल्यास किंवा आजारी व्यक्तीस भाज्या किंवा फळे खावयास देण्यापेक्षा त्यांचे त्ताजे तयार केलेले रस प्यावयास द्यावेत. प्रोसेस्ड ज्यूस शक्यतो पिऊ नयेत.

आहारतज्ञ आपल्या आहारामध्ये दररोज किमान पाव किलो भाजी आणि साधारण दोनशे ग्रॅम फळे असली पाहिजेत असे म्हणतात. ह्या भाज्या शिजवून किंवा सॅलडच्या स्वरूपात खाल्ल्या जातात. पण कधी वेळेअभावी भाज्या शिजवणे किंवा सॅलड चिरत बसणे जमत नाही. किंवा भाजी आणि सॅलड तयार करूनही इतके सगळे एकदम खाणे शक्य ही होत नाही. पण या भाजीचा आणि फळाचा रस काढून घेतला आणि त्याचे सेवन केले, तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषणद्रव्यांची दैनंदिन मात्रा आपल्याला सहज मिळू शकते. मात्र फळे व भाज्यांचा रस एकत्र करताना त्यातील ऐंशी टक्के रस भाज्यांचा व उर्वरित वीस टक्के फळांचा रस असावा.

आपले शरीर ‘ डीटॉक्सिफाय ‘ करण्यासाठी ही भाज्या व फळांचे रस अतिशय उत्तम आहेत. आपल्या आहारामध्ये आपण अनेकदा प्रोसेस्ड, तळलेले, किंवा बेकरी मधील पदार्थांचे सेवन करीत असतो. या पदार्थांमार्फत अनेक घातक पदार्थ आपल्या शरीरामध्ये साठत असतात. फळांच्या किंवा भाज्यांच्या ताज्या रसामुळे हे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत मिळते. तसेच भाज्या आणि फळांमधील पोषक तत्वांमुळे शरीरातील अवयवांबरोबरच त्वचा व केसांच्या आरोग्यावरही चांगले परिणाम दिसून येतात.

फळे व भाज्यांच्या ताज्या रसाच्या सेवनाने शरीरातील शक्ती किंवा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. विशेषतः बीटच्या रसाने शरीरामध्ये ताकदीची वाढ होते. ज्यांना शारीरिक श्रम जास्त करावे लागतात अश्या व्यक्तींनी आपला स्टॅमिना वाढविण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन अवश्य करावयास हवे. भाज्या शिजवून खाताना कित्येकदा त्यातील पोषक द्रव्ये उष्णतेमुळे नाहीशी होतात. पण भाज्या व फळांचे ताजे रस घेतल्याने त्यांच्यामधील पोषक द्रव्य अबाधित राहून त्यांचा फायदा आपल्या आरोग्यास होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment