जामीनावर सुटलेले पी. चिदंबरम संसदेत दाखल


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने 106 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर केला आणि बुधवारी संध्याकाळी माजी अर्थ मंत्री पी.चिदंबरम यांची सुटका झाली. यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात आज ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही त्यांनी उपस्थिती लावली आहे.

तिहार तुरूंगातून चिदंबरम बाहेर आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी, त्यांनी माध्यमांना 106 दिवसांमध्ये आपल्या विरोधात एकही गुन्हा सिद्ध न करता आल्याचे सांगितले. यानंतर थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील राहत्या घरी ते गेले. चिदंबरम यांच्या स्वागताला त्यांचा मुलगा खासदार कार्ती उपस्थित होता. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यांनी याआधी संबंधित खटल्यासंदर्भात बोलण्याचे टाळले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आज्ञेनुसार वागणार असल्याचे त्यांनी कारागृहा बाहेर येताच सांगितले. आता चिदंबरम यांना तत्काळ जामीन मंजूर झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment