‘तान्हाजी’मधील पहिले वहिले गाणे तुमच्या भेटीला


काही दिवसांपूर्वीच अजय देवगणच्या बहुचर्चित ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिले वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून मेहुल व्यास यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केले आहे.

मोठ्या संख्येने बॅक डान्सर्सही तान्हाजी चित्रपटातील या गाण्यामध्ये दिसतील. तसेच या गाण्यामध्ये गणेश आचार्यने डान्सशी 36 चा आकडा असलेल्या अभिनेता अजय देवगण कडून चांगलेच नाचवून घेतले असेच दिसत आहे. या गाण्याचे बोल अनिल वर्मा यांनी लिहिले असून मेहुल व्यास यांनीच गायकाची आणि संगीतकाराची धुरा सांभाळली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, भूषण कुमार, कृष्णन कुमार यांनी केली आहे.

अजय देवगणसह या चित्रपटात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या अंदाजात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर तर तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका काजोल साकारणार आहे.

Leave a Comment