पंकजा मुंडेंसह हे दिग्गज नेते देखील भाजपला देणार दणका?


मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पराभूत झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य उफाळून आले आहे. फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक संदेश दिल्यानंतर त्या भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण एकट्या पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच भाजपचा संपूर्ण प्रचार फिरत राहिला. त्यातच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगरमधून, विनोद तावडे यांचे बोरिवलीतून, प्रकाश मेहता यांचे घाटकोपरमधून आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचे तिकीट कापण्यात आल्यामुळे हे नेते आधीच राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नुकताच एकनाथ खडसे यांनी रोहिनी खडसे आणि पंकजा मुंडे या पडल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा रोख होता का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आगामी काळात पक्ष नेतृत्व आम्हाला काय जबाबदारी देते ते पाहून निर्णय घेऊ, असे प्रकाश मेहता यांनी म्हटले आहे.

Leave a Comment