मायक्रोसॉफ्टकडून आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला कोटींचे पॅकेज


मुंबई – सध्या इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष दिसून येत असून सर्वाधिक पॅकेज असलेली कंपनी आपल्याला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ऑफर कशी देईल अशा प्रकारची एक जणू शर्यतच त्यांच्या लागली असते. आयआयटी मुंबई हे या प्लेसमेंटच्या शर्यतीत नेहमीच टॉपवर असते. या वर्षी, आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या अगदी पहिल्याच दिवशी मोठमोठ्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे. यात उबर, गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टॉप कंपन्यांचे वर्चस्व दिसून आले आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून यावर्षी एका विद्यार्थ्याला 1.17 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे तर 1.02 कोटी रुपयांचे पॅकेज उबर कंपनीकडून दिले आहे. तसेच ३२ लाख रुपयांचे पॅकेज गुगल कंपनीकडून विद्यार्थ्याला ऑफर करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या टप्प्यात 18 कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली. तसेच रात्री २ वाजेपर्यंत पहिल्या दिवसाचा दुसरा टप्पा हा सुरु होता. परंतु त्यात किती कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना ऑफर देण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आर्थिक मंदी सध्या अनेक क्षेत्रात सुरु असल्यामुळे, प्लेसमेन्टसाठी यंदा कमी कंपनी येतील अशी शंका वर्तवण्यात येत होती. पण, हा अंदाज फोल ठरवत कॅम्पस प्लेसमेंटला मायक्रोसॉफ्ट, उबर आणि गूगल यासारख्या कंपन्यांनी हजेरी लावल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत. तसेच एकूण 110 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नोकऱ्या मिळाल्या आहेत तर 1700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Leave a Comment