बलात्कार पीडितेचे नाव सोशल मीडियावर लिहिल्यास दोन वर्षांची शिक्षा - Majha Paper

बलात्कार पीडितेचे नाव सोशल मीडियावर लिहिल्यास दोन वर्षांची शिक्षा


काही दिवसांपूर्वीच हैदराबादमधील एका महिला पशुवैद्यावर बलात्कार करून, तिला जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरून गेला असून, या घटने प्रति सोशल मीडियावर लोकांचा रोष उमटत आहे. या घटनेबद्दलचा निषेध सोशल मिडियाद्वारे जनता, कलाकार, सेलेब्ज, राजकारणी लोक अशा अनेकांनी व्यक्त केला आहे. लोक आपल्या भावना व्यक्त करताना पीडितेचे व्हायरल फोटो शेअर करत आहेत. तसेच ट्विटरवर तिच्या नावाचे हॅशटॅगही पोस्ट केले गेले आहेत. पण पीडितेचे नाव अथवा ओळख अशा प्रकरणांमध्ये सार्वजनिकरित्या जाहीर केले तर तुम्हाला 2 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

लैंगिक छळ किंवा बलात्काराच्या घटनांमधील कोणत्याही व्यक्तीची भारतीय दंड संहितेच्या कलम 228 अन्वये ओळख उघड करता येणार नाही असा कायदा असून पीडितेचे नाव मुद्रित किंवा प्रकाशित करणारी एखादी व्यक्ती किंवा संस्थेला दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येऊ शकतो.

ओळख जाहीर केल्यास संघर्ष अजून वाढतो. त्याचबरोबर पीडितेच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले जाते. तसेच पीडिताला मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अज्ञात बलात्कारी पीडिताच्या ओळखीचा फायदा घेऊ शकतो. पूर्वग्रहदूषित पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि वकील गैरवर्तन करू शकतात.

Leave a Comment