महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घ्यावी; सुप्रिया सुळे


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शासकीय नोकरभरतीसाठी राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले ‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी केली. वेगळा विभाग सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत निर्माण करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ही पोर्टल सेवा महायुती सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती. पण अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडे दौऱ्यांच्यानिमित्ताने राज्यभरात फिरताना महापोर्टलविषयी तक्रार केली होती. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात लक्षणीय आहे. महासेवा पोर्टलविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन झाले होते. अनेक युवकांनी त्यावेळी आपल्याला भेटून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

21 प्रकारच्या दिव्यांग प्रकारांना दिव्यांगाच्या 2016 सालच्या कायद्यामुळे सामावून घेण्यात आल्यामुळे दिव्यांगांबाबतच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. यामुळेच इतर काही राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे, याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिव्यांगाच्या व महापोर्टल सेवा बंद करावी या मागण्यांसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Leave a Comment