
काही दिवसांपुर्वीच बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित दबंग-३ चित्रपटातील नवीन गाणे रिलीज करण्यात आले होते. ‘हुड हुड दबंग’ असे हे गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. पण हे गाणे त्याच्या लोकप्रियतेसाठी नाही, तर त्यावर होणाऱ्या टीकेमुळे ट्रेंड होत आहे. हिंदू साधू-संतांचा या गाण्यात अपमान केल्याची टीका करण्यात येत आहे.
ट्विटरवर ट्रेंड होत आहे #BoycottDabangg3
अभिनेता सलमान खान सोबत या गाण्यामध्ये नृत्य करणाऱ्या कलाकारांनी नागा साधूंची वेशभूषा केल्यामुळेच हे गाणे वादात सापडले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर, नाचताना साधू-संतांना दाखवल्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत. ट्विटरवर #BoycottDabangg3 अशा हॅशटॅगच्या माध्यमातून लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
हिंदू संतांचा असा अपमान सहन केला जाणार नाही. हिंदू धर्मालाच बॉलिवूड हे कायम लक्ष्य करत आले आहे, अशी टीकादेखील ‘पीके’ आणि ‘ओ माय गॉड’ या चित्रपटांचे उदाहरण देत केली जात आहे. तर, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समिती करत आहे. ज्याप्रकारे साधू संतांना सलमान खानने नाचताना दाखवले आहे, त्याप्रमाणेच तो मौलवी किंवा पादरी यांना नाचताना दाखवेल का? असा प्रश्नही या समितीने उपस्थित केला आहे.
