… आदरणीय माँसाहेब आणि बाळासाहेब


मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ६.४० वाजता हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीआधी भावनिक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होते. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, असे म्हटले आहे.

त्याआधी आज सकाळी देखील सुप्रिया सुळेंनी ट्विट करत आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन… उद्धवजी ठाकरे, असे म्हटले होते.


राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय परिस्थितीत गुंता वाढला होता. तेव्हा या घटनेची शरद पवारांना पत्नी प्रतिभाताई पवार यांनी आठवण करुन दिली अशी चर्चा आहे. बाळासाहेबांनी आपल्या मुलीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला मदत केली. आता बाळासाहेबांचा मुलगा एकटा असताना आपण त्याच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे प्रतिभाताईंनी पवारांना सांगितल्यानंतर पवारांचा निर्धार आणखी पक्का झाला आणि पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा चंगच बांधला.

एकेकाळी निवडणुकीला सुप्रिया सुळे उभ्या असताना त्या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना हमी दिली होती. शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला हा शब्द पाळला. त्याच धर्तीवर आज बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे राजकारणाच्या या रिंगणात एकटे पडताना दिसत असतानाच त्याचा आधार होण्याचा आग्रह खुद्द प्रतिभा पवार यांनी धरल्याचेही म्हटले जाते. परिणामी शिवसेनेच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा बहुमत, निवडणुका, मतभेद, मनधरणी यांच्यासमवेत नात्यांच्या बळावरही लढले गेले असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Comment