इस्रोकडून कार्टोसॅट-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


चेन्नई: आज सकाळी ९.२८ वाजता पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणाऱ्या कार्टोसॅट-३ या उपग्रहासह अमेरिकेच्या १३ अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन या प्रक्षेपणावेळी श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. या मिशनचे इंजिनीअर्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ त्यांच्यासोबत उपस्थित होते. इस्रोचे चांद्रयान २ नंतरचे हे पहिलेच प्रेक्षपण आहे.

भारताचा डोळा असे कार्टोसॅट – ३ ला म्हटले जात आहे. कारण मोठ्या स्तरावर मॅपिंग या उपग्रहाद्वारे केले जात आहे. या उपग्रहाद्वारे शहरांचे मॅपिंग केले जाणार आहे. या मॅपिंगमुळे ग्रामीण भागातील मुलभूत सोयीसुविधांचे व्यवस्थापन करणे सुकर होणार आहे. हा कार्टोसॅट श्रृंखलेतील नववा उपग्रह आहे.

याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडमधून करण्यात आले. मंगळवारी सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी पीएसलव्ही-सी४७ मोहिमेच्या ‘काऊंटडाऊन’ला श्रीहरीकोटा येथे सुरुवात झाली. पीएसएलव्ही-सी४७ हा उपग्रहवाहक आपल्या ४९व्या मोहिमेअंतर्गत १३ नॅनो उपग्रहांसह कार्टोसॅट-३ अवकाशात सोडणार आहे.

Leave a Comment