दादा-ताईंची विधानभवन परिसरात गळाभेट!


मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अखेर काल शेवट झाला आणि आजच्या दिवसाचा मुहूर्त सत्तास्थापनेला मिळाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे सरकार राज्यात स्थापन होत आहे. आज सकाळीच तिन्ही पक्षांचे आमदार विधानभवनात आमदारांच्या शपथविधीसाठी पोहोचले आणि तिथेच एक असा क्षण समोर आला. तो म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे बहिण-भाऊ समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांची विधानभवन परिसरात गळाभेट घेतली.

हा भावूक क्षण प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी न टिपला असता तरच नवल म्हणावे लागले असते. विधानभवनाच्या दारातच सुप्रिया सुळे सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभ्या होत्या. तेवढ्यात अजित पवार आले आणि दोघांनी गळाभेट घेत एक हसरा कटाक्ष टाकला. कॅमेऱ्यांना छान पोझ दिली आणि गेल्या चार दिवसांची कटुता जणू साखरेसारखी विरघळली.

अजितदादांनी शनिवारी पहाटे बंडाचे हत्यार उगारल्यानंतर पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवर त्यासंदर्भातील स्टेटस देखील ठेवले होते. त्या माध्यमांना सामोरे जातानाही भावुक झाल्या होत्या. मात्र आज हा वाद, मतभेदांची कटुता या गळाभेटीत विरघळून गेली.

Leave a Comment