मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयार


मुंबई – राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता नवीन वळण आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याचा दावा केला आहे. ते पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीची आज संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. नेमका काय निर्णय या बैठकीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

22 नोव्हेंबर रोजी ठाकरे कुटुंबातील सदस्य मुख्यमंत्री होणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निश्चित केले होते. ते म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच नव्या सरकारचे नेतृत्व करतील, याविषयी आमच्या सर्वांचेच एकमत झाले आहे. अखेर आज शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या दाव्यानंतर आजवर राजकारणात ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका निभावणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हाती आता राज्याचा कारभार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यापर पाणी फेरले होते. देवेंद्र फडणवीसांनी बहुमत नसताना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत 24 तासांत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment