अजित पवारांसोबत गेलेले तीन आमदार स्वगृही परतले!


मुंबई : अजित पवार यांच्या पाठिशी 27 आमदार असल्याचा दावा भाजपने केला असतानाच, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्यासोबत गेलेले तीन आमदार परतले आहेत. दिल्लीहून मुंबईत अनिल पाटील आणि दौलत दरोडा परतले असून दिल्लीहून नरहरी झिरवळही निघाले आहेत. ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्येच त्यांचा देखील मुक्काम असेल. राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदारच आता संपर्कात नाहीत. अजित पवार आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे संपर्कात नाही.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हे आमदार अजित पवारांच्यासोबत राजभवनात उपस्थित होते. हे तिन्ही आमदार शपथविधीनंतर दिल्लीला गेले होते. आम्हाला वाटले की पवार साहेबांचा पाठिंबा असेल म्हणून आम्ही गेलो होतो. आमच्या पक्षाचे दादा नेते आहेत आम्ही त्यांचा आदेश पाळला. पण आता आम्ही परत आलो आहोत. पवार साहेबांसोबतच आम्ही आहोत. कुठेही काही गैरसमज नसल्याची प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी दिली.

दुसरीकडे रेनेसॉन्स हॉटेलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम ग्रॅण्ड हयातमध्ये हलवण्यात आला आहे. सर्व आमदारांना रातोरात हयातला नेण्यात आले. साध्या वेशातील पोलीस रेनेसॉन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना दिसले. त्यामुळे खबरदारी म्हणून सगळ्या आमदारांना ग्रॅण्ड हयातमध्ये हलवण्यात आले. दरम्यान रात्री उशिरा छगन भुजबळ, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे आमदारांना भेटायला गेले होते.

Leave a Comment