महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सकाळी सुनावणी


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुटण्याऐवजी आणखी चिघळत चालला आहे. सरकार स्थापन करून भाजपाने सर्वांनाच चकित केले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या घटनेनंतर थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. काल रविवार असताना या याचिकेवर सुनावणी झाली. तर आज न्यायालयात सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यात आली. यावर न्यायालयाने यावरील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय यासंदर्भातील निर्णय उद्या देणार आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीतील पक्षांकडून आमदारांना एकसंध ठेवून भाजपाला बहुमत चाचणीत पराभूत करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

महाराष्ट्रात भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर या शपथविधीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन दिवस या याचिकेवर सुनावणी झाली. ज्या कागदपत्रांच्या आधारे सत्तास्थापनेसंदर्भात राज्यापालांनी निर्णय घेतला. ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंनी त्यावर युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (२६ नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान न्यायालयात राष्ट्रवादीची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, सभागृहात आम्ही पराभूत व्हायला तयार आहोत. पण, तरीही भाजप बहुमत चाचणी घ्यायला तयार नसल्याचे सिंघवी म्हणाले. यावेळी त्यांनी १५४ आमदारांच्या सह्यांचे पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पण न्यायालयाने या खटल्याची व्याप्ती वाढवणार नसल्याचे सांगत ते घेण्यास नकार दिला.

Leave a Comment