फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी हे आहेत नियम


नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांकडे दैनंदिन व्यवहारादरम्यान फाटलेल्या नोटा येतात. पण फाटलेल्या नोटा घेण्यासाठी अनेकजण आढेवेढे घेतात. यापुढे अशा नोटा बदलण्यासाठी कोणाला विनंती करावी लागणार नाही. कारण यापुढे फाटलेली नोट बदलायची असल्यास कोणत्याही बँकमध्ये बदलून दिली जाऊ शकते. फाटलेल्या नोट बदलण्यासाठी बँक कर्मचारी नकार देऊ शकत नाही. सर्व बँकांना अशाप्रकारच्या नोटा बदलून देण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकने दिले आहेत. सोबतच या सुविधेबाबत सर्व बँकांमध्ये नोटीस लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी बँका अनेकदा टाळाटाळ करत असल्याची तक्रार समोर आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी जावे लागेल असे बँकांकडून अनेकदा ग्राहकांना सांगण्यात येते. ग्राहकांना अशा परिस्थितीत मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. काही लोक बाहेरुन नोट बदलून देणाऱ्यांकडून, नोटा बदलून घेतात. परंतु अशावेळी अनेकदा पैशांची पूर्ण रक्कम मिळत नाही.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ज्या बँक नकार देतील त्यांची तक्रार बँकिंग लोकपाल किंवा रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर तक्रार करता येऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या नोट रिफंड २०१८च्या नियमांअंतर्गत बँकांना नोट बदलण्याची गरज आहे. नोटेच्या फाटलेल्या भागाच्या आधारे त्याचे रिफंड दिले जाते. नियमांनुसार, ५० रुपयांपेक्षा खाली आणि त्यावर असलेल्या नोटांसाठी रिफंडचे वेग-वेगळे नियम आहेत.

५० रुपयापेक्षा अधिक किंमत असलेल्या नोटा बदलायच्या असल्यास आणि नोटेचा ८० टक्के भाग चांगला असल्यास बँक पूर्ण रिफंड देते. फाटलेल्या नोटेचा ४० टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल. जर नोटेचा ४० टक्क्यांहून छोटा भाग असल्यास त्याचे रिफंड मिळणार नाही.

Leave a Comment