30 मिनिटात रोबॉट आणि ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी करणार अ‍ॅमेझॉन

तुमच्या ऑर्डरची केवळ 30 मिनिटांमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने 35 अब्ज डॉलर (जवळपास 2.5 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे. हॉलिडे सीझनदरम्यान प्राइम सदस्यांना एका दिवसात डिलिव्हरी देण्यासाठी अ‍ॅमेझॉन अतिरिक्त गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅमेझॉनचे कंझ्यूमर विभागाचे सीईओ जेफ विल्फ म्हणाले की, जर तुमच्याकडे ड्रोन फ्लीट असेल तर तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता आणि अर्ध्या तासात डिलिव्हरी केली जाईल.

लवकरात लवकर डिलिव्हरी व्हावी यासाठी अ‍ॅमेझॉनकडे अमेरिका आणि जगभरात फुलफिलमेंट सेंटर आहेत. अ‍ॅमेझॉन अशा रोबॉटचे टेस्टिंग करत आहे, जे पॅकेज घेऊन जावू शकेल. या महिन्याच्या सुरूवातीला अ‍ॅमेझॉनने बोस्टन येथे रोबॉट डिझाईन आणि निर्मितीसाठी एक प्लांट देखील सुरू केला आहे. ड्रोन बनविण्यासाठी अ‍ॅमेझॉन 6 वर्षांपासून काम करत आहे. कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये देखील गुंतवणूक करत आहे. याशिवाय कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकवर देखील काम करत आहे.

2012 मध्ये अ‍ॅमेझॉनने कीवा सिस्टम्स खरेदी करत रोबॉटिक्समध्ये पाऊल ठेवले होते. सध्या कंपनी नवीन लोकांना भरती करत आहे, मात्र रोबॉट तयार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना काढण्याची देखील शक्यता आहे.

 

Leave a Comment